पुणे-नाशिक महामार्गावर मोशी ते चाकणदरम्यान वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. यामुळे प्रवासी, वाहनचालक तसेच या महामार्गालगतच्या गावांमध्ये राहणारे नागरिक हैराण झाले आहेत. वाहतुकीची समस्या सोडवणार तरी कोण? असा प्रश्न वाहनचालकांनी केला आहे.
चाकण शहरातून जाणार्या नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकात वाहतुकीचा प्रश्न दररोज भेडसावतो. परंतु, त्यावर तोडगा काढण्यात राजकीय नेते, प्रशासन, पोलिस खात्याला अपयश आले आहे.
तासन् तास जागेवर वाहने उभे राहत असल्याने इंधन, वेळ वाया जात आहे. दरम्यान, या अक्राळविक्राळ समस्येकडे विकासकामांचे फ्लेक्स लावून श्रेय लाटणार्यांना लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टीका नागरिकांनी केली आहे.
सुमारे 20 वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण झाले. एमआयडीसीमध्ये कारखाने वाढले. महामार्गालगत मोशी, चिंबळी, कुरुळी, चाकणमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले. रस्त्यालगत मॉल्स, व्यापारी संकुल, अनधिकृत बांधकामे झाली. रस्त्यांवर वाहने वाढली. रस्ता मात्र तेवढाच राहिला.
सन 2014 मध्ये नाशिक फाटा ते चांडोली, राजगुरूनगरपर्यंतच्या महामार्गाचे सहापदरीकरण मंजूर करण्यात आले होते. त्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तत्कालीन कारभार्यांनी विरोध केला.
परिणामी हा प्रकल्प लांबला. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या महामागार्वरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणजे दुमजली रस्ता करण्याच्या घोषणा झाल्या असल्या तरी त्याचे काम होण्यास कित्येक लागणार असल्याने ही समस्या अशीच राहणार आहे.
उड्डाणपुलांची गरज चाकण औद्योगिक पट्ट्यामुळे या भागातील लोकसंख्या आणि वाहने वाढली. त्यामुळे सध्याचा चौपदरी रस्ता अगदीच अपुरा पडत आहे. या भागात आणखी काही कंपन्या येणार आहेत. अनेक गृहप्रकल्प होत आहेत. एमआयडीसीचा पाचवा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यानंतर या समस्येत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे महामार्गाचे रुंदीकरण तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल होणे काळाची गरज आहे. या महामार्गालगतच्या गावांच्या वाहतुकीचे नियोजनही आवश्यक आहे. या महामार्गावर सर्रास वाहतुकीचे नियम तोडून विरुद्ध दिशेने वाहने दामटली जातात.
विशेषतः चाकणच्या आसपास हे प्रमाण अधिक आहे. अवैध वाहतूक करणार्या वाहने व बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीच्या समस्येत भरच पडली आहे. त्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.