शहराने प्रदूषणाची धोकादायक पातळी गाठल्यानंतर धोकादायक धूलिकण रोखण्यासाठी आता शहरात सुरू असलेली बांधकामे आणि उड्डाणपूल, मेट्रो इत्यादी प्रकल्पांच्या कामावर ओले हिरवे कापड, ओले ज्यूट कापड अथवा ताडपत्रीने झाकावे लागणार आहे.
राज्याच्या पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने दिलेल्या यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनांची तातडीने अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली.
हवेतील वाढत्या धूलिकणांमुळे देशभरातील मोठ्या शहरांमध्ये वायुप्रदूषणाने अतिधोका दायक पातळी गाठली आहे. ते रोखण्यासाठी पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
तातडीने या सूचनांची अंमलबजावणी महापालिका करणार आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्यास ही बांधकामे थांबविण्यात येतील अथवा सील केली जाणार आहेत.
असे असतील नियम
50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या तसेच 1 एकरपेक्षा अधिक जागेत बांधकाम. प्रकल्पाच्या परिघाभोवती 25 फूट उंचीचे पत्रे बसविण्यात यावेत. 1 एकरपेक्षा अधिक जागेत बांधकाम असल्यास बांधकामाच्या परिघाभोवती 25 फूट उंच पत्रे बसविण्यात यावेत.
बांधकाम जागा ताडपत्री, ओल्या हिरव्या कापडाने, ज्यूट शीटने झाकावी. बांधकाम कामगारांना मास्क, गॉगल बंधनकारक करावा. उड्डाणपूल यांसारख्या सर्व कामांच्या ठिकाणी किमान 20 फूट बॅरिकेडिंग. स्मॉग गन वॉटर स्प्रिंकलरचा वापर बांधकामाच्या वेळी करावा.
बांधकाम ठिकाणी माती, खडी, वाळू झाकून ठेवावी. बांधकामाचा राडारोडा प्रक्रिया प्रकल्पातच पाठविणे बंधनकारक. मोकळ्या जागेत राडारोडा टाकल्यास वाहने जप्त करणार.