PUNE NEWS : हेल्मेट वापरा तरच प्रवेश, वाचा सविस्तर…

Photo of author

By Sandhya

हेल्मेट

महापालिकेची मुख्य इमारत तसेच शहरातील इतर कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. तसेच, संबंधितांनी हेल्मेट न घातल्यास त्यांना महापालिकेच्या आवारात प्रवेश देवू नये तसेच वाहन पार्किंग करण्यासही मनाई करावी, असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी काढले आहेत.

तसेच, रस्ते अपघात रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर तसेच वाहतूक नियमांचे पालन स्वत: पासून सुरू करण्याची गरज असल्याने विभागीय आयुक्तांनी काही महिन्यांपूर्वी सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश काढले आहेत, हे आदेश महापालिकेसही प्राप्त झाले असून त्यानुसार पालिका कर्मचाऱ्यांना आजपासून हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

देशात व राज्यात रस्ते अपघातांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. त्यातही दुचाकीच्या अपघातांची संख्या अधिक असून दुचाकी स्वरांनी हेल्मेट वापरल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेटची सक्ती व जनजागृती करावी, अशा सूचना न्यायमुर्ती सप्रे यांनी दिल्या आहेत.

त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेस याबाबतचे आदेश दिले असून महापालिकेत त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. …तर होणार शिस्तभंगाची कारवाई अतिरिक्त आयुक्तांनी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित कर्मचारी तसेच विभाग प्रमुखांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक असून त्याकडे दूर्लक्ष केल्यास संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार दंड आकारणी तसेच याची नोंद सेवा पुस्तकात केली जाणार आहे. 

Leave a Comment