PUNE NEWS : कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला मिळणार गती..!

Photo of author

By Sandhya

कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला मिळणार गती

मागील काही दिवसांपासून कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरु होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे राज्य सरकारने मंजूर केलेले १४० कोटी रुपये मिळण्यास विलंब झाला होता.

परंतु, आता ती रक्कम त्वरित मिळणार असून कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरण आणि भूसंपादनाच्या कामाला गती मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी करण्यात आली.

यामध्ये कात्रज चौकातून येणाऱ्या उड्डाणपुलाची लांबी वाढवून गोकुळनगर चौकाच्या पुढे नेण्यात येणार आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला विलंब होत असल्याचे कारण देत लांबीला नकार देण्यात येत आहे.

तसेच, राजस सोसायटी चौकाच्यापुढे भूसंपादन झाले नसल्याने त्याठिकाणी तत्काळ उड्डाणपूल उतरविणे अशक्य असून वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी उर्वरित जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

शत्रुंजय मंदिर चौकातील ग्रेड सेपरेटर आणि खडीमशीन चौकातील ग्रेट सेपरेटरच्या कामांना गती देण्यात येणार आहे. या दोन्ही ग्रेड सेपरेटरचे काम पुढील महिनाभरात पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, असेही यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावेळी पथ विभागाचे अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे, उपअभियंता धनंजय गायकवाड, कनिष्ठ अभियंता राजेश्वरी मुरादे उपस्थित होते.

शत्रुंजय मंदिर चौक आणि खडीमशीन चौकाजवळील भुयारी मार्गांची पाहणी करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणच्या कामाला गती देण्यात येईल. त्याचबरोबर, इतर ठिकाणीही तत्काळ भूसंपादन करण्याच्या दृष्टिकोनातू प्रयत्न करण्यात येणार आहेत.

तसेच, माऊली चौकात अंडरपास करतेवेळी कुठल्याही प्रकारचे वाहतूक नियोजन बिघडू नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून ही पाहणी करण्यात आली आहे. – साहेबराव दांडगे, अधिक्षक अभियंता, पथविभाग, महापालिका

Leave a Comment