PUNE : परवानगी फांद्या तोडण्याची; पण तोडले मोठे ओंडके

Photo of author

By Sandhya

ओंडके

 महापालिकेने पिंपळाच्या फांद्या तोडण्यासाठी परवानगी दिलेली असतानाही प्रत्यक्षात झाडाचे मोठे ओंडके तोडण्यात आल्याचा आरोप गुरुवार पेठेतील एका नागरिकाने केला आहे.

दरम्यान, दिलेल्या परवानगी नुसारच झाडांच्या धोकादायक फांद्या तोडल्याचे स्पष्टीकरण भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने दिले आहे. महापालिकेच्या गुरुवार पेठेतील सावित्रीबाई फुले दवाखान्याच्या पाठीमागे एक पिंपळाचे जुने झाड आहे.

या झाडाच्या धोकादायक फांद्या तेथील घरांवर असल्याने त्या तोडण्याची मागणी रहिवाशांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाने झाडाची 5 मीटर उंची कमी करण्याची व फांद्यांचा व्यास कमी करण्याची परवानगी दिली.

फांद्या कापण्याचे काम बुधवारी हाती घेतल्यानंतर येथील रहिवासी निरंजन साळवे यांनी त्यावर आक्षेप घेतला. परवानगी फांद्या तोडण्याची असताना झाडांचे ओंडके कापले जात असल्याची तक्रार साळवे यांनी केल्याने काम थांबविण्यात आले.

यासंदर्भात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे उद्यान निरीक्षक भरत गायकवाड यांच्याशी संपर्क केल्यानंतर ते म्हणाले की, झाडाची उंची जास्त आहे. झाडाच्या फांद्या धोकादायक पद्धतीने तेथील घरावर असल्याने झाडाची उंची व व्यास कमी करण्याची परवानगी दिली.

परवानगीनुसार फांद्या कापण्याचे काम सुरू होते. मात्र, रहिवाशांच्या अंतर्गत वादातून विरोध झाल्याने काम बंद ठेवले आहे.

Leave a Comment