
पुणे शहरातील कोथरूड परिसरात एका गंभीर गुन्ह्याचा तपास करत असताना, पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता आणि सुसंघटित गुप्तचर यंत्रणेची ताकद दाखवून दिली आहे. कोथरूड पोलीस ठाण्याच्या पथकाने धाडसी कारवाई करत एका गुन्ह्याच्या मुख्य आरोपीला एका कॅनलमधून पकडले.
फरार असलेला वॉन्टेड आरोपी साहिल परशुराम वाकडे (वय २५) याच्यावर गु.र.नं. ५२/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 103(2), 189(4), 190, 61(2), 111(1), 238, शस्त्र अधिनियम कलम 4(25), 3(25), तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) कलम 3(1), 3(2), व 3(4) अशा गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या चौकशीत तो फरार होता..
गुप्त बातमीदाऱ्यांची अचूक माहिती आणि पोलिसांची तत्परता
सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी सानप, पो.ह.वा. चौधर, पो.शि. राठोड व पो.शि. वाल्मिकि हे पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी साहिल वाकडे हा शास्त्री नगर येथील स्मशानभूमीच्या मागे असलेल्या कॅनलमध्ये लपून बसला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांनी त्वरित कॅनल परिसरात धाड टाकली. आरोपीस अत्यंत हुशारीने शोधून काढण्यात आले आणि अटक करण्यात आली.
कायदेशीर कारवाई :
अटक करण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त मा. पठारे सो. यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे स्थानिक परिसरात दिलासा व्यक्त करण्यात येत असून पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांची अशी धाडसी मोहीम सुरूच राहणार
ही कारवाई फक्त एका आरोपीच्या अटकेपुरती मर्यादित नव्हे, तर स्थानिक गुन्हेगारीवर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल मानलं जात आहे. पुणे पोलिसांनी दाखवलेली तत्परता, गुप्त बातमीदाऱ्यांची अचूक माहिती आणि धाडसी निर्णयक्षमतेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुळावर घाव घालण्याचे ठोस संकेत मिळत आहेत.