
पुणे शहरात दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीचे होणारे प्रदूषण देशात सर्वाधिक ठरले आहे. 2018 ते 2022 या कालावधीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचे प्रदूषण देशात सर्वाधिक ठरले आहे. त्यामुळे पुणेकरांनी यंदाच्या दिवाळीत काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
आजवर दिवाळीच्या प्रदूषणात दिल्ली, मुंबई, अहमदाबाद व पुणे असा क्रम होता. 2015 ते 2017 पर्यंत दिल्ली व मुंबई या शहरांत स्पर्धा होती. कधी दिल्ली तर कधी मुंबईचे प्रदूषण देशात अव्वल ठरत होते. मात्र, 2018 पासून दिवाळीतील फटाका प्रदूषणात पुणे शहराने आघाडी घेतली आहे.
सफर (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग रिसर्च) या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाशी संलग्न असलेल्या पुणे शहरातील संस्थेने केलेल्या संशोधनानुसार पुणे शहराने दिवाळी प्रदूषणात देशात आघाडी घेतली आहे. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी रस्ता सर्वाधिक प्रदूषित… सर ही संस्था दिल्ली, मुंबई, अहमदाबाद व पुणे शहरांच्या दिवाळातील प्रदूषणाचा अहवाल लक्ष्मीपूजनाच्या दुसर्याच दिवशी प्रसिध्द करते.
गेल्या पाच वर्षांच्या दिवाळीतील प्रदूषणाचा अभ्यास केला असता 2018 ते 2022 या पाच वर्षांत पुणे शहर अव्वल ठरले. 2017 व 18 या दोन वर्षांमध्ये पी. एम. 2.5 या धूलिकणांचे प्रमाण 400 ते 500 पटींनी वाढले होते,
तर 2019 ते 2022 या चार वर्षांत ते 100 ते 150 पटींनी वाढले होते. कोरोनानंतर पुणेकरांनी फटाके कमी फोडले, हे खरे आहे. त्यामुळे 2020 व 2021 मध्ये फटक्यांचे प्रदूषण 2017 व 2018 या वर्षांच्या तुलनेत खूप कमी झाले.
मात्र, इतर महानगरांच्या तुलनेत ते जास्तच ठरले. सफर संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार शहरात लक्ष्मी रस्त्यावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक प्रदूषण होते. दहा केंद्रांव्दारे तपासणी.. भारतीय महानगरांमधील हवेची गुणवत्ता आणि हवामानाच्या दृष्टीने पूर्वसूचना देण्यासाठी पुणे शहरात हवेची गुणवत्ता तपासणी प्रकल्प 2015 पासून सुरू झाला.
याचा उपयोग वायुप्रदूषणाची भूमिका आणि त्याचा मानवी आरोग्यासह पीक उत्पादनावर होणारा परिणाम तपासण्यासाठी सुरू झाला. शहराच्या हवेच्या गुणवत्तेची अचूक माहिती देण्यासाठी या प्रणालीने आतापर्यंत चांगले काम केले आहे. तरीही पुढील अभ्यास करण्यासाठी स्थानके अपग्रेड करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.