पावसामुळे शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असतानाच अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा (एटीएमएस) उभारण्यासाठी खोदाई केलेल्या ठिकाणीही खड्डे पडले आहेत.
त्यामुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथविभागाने उपाय योजना हाती घेतल्या असून, नागरिकांनी खड्ड्यांची माहिती द्यावी, यासाठी 9049271003 हा मोबाईल नंबर उपलब्ध केला आहे. समान पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाईनच्या कामांमुळे मागील वर्षी शहरातील लहान-मोठे रस्ते खोदण्यात आले.
खोदाईनंतर योग्य पद्धतीने रस्ते दुरुस्त न केल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. रस्त्यावरील खड्ड्यांवरून प्रशासनावर टीका झाल्यानंतर‘डीएलपी’मध्ये (दायित्व कालावधी) असलेल्या ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, त्या रस्त्यांचे काम करणार्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली.
तसेच, पावसाळा संपताच प्रमुख रस्त्यांचे पाच विभाग करून निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. यापैकी दोन झोनमधील कामे झाली आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यातच शहरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी विविध चौकांमध्ये एटीएमएस सिग्नल्स यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे.
खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत आरएमव्ही तैनात केली असून, पावसाची उघडीप मिळताच गतीने खड्डे बुजविण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांनी आपणास दिसणार्या खड्ड्यांची माहिती 9049271003 या मोबाईल क्रमांकावर कळवावी. – साहेबराव दांडगे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, महापालिका.