
हडपसर परिसरात एका कारमधून पुणे पोलिसांनी सुमारे साडेतीन कोटींची रोकड जप्त केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचसह लोणी काळभोर वाहतूक पोलिस आणि हडपसर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.
ही रोकड कशासाठी, कोठे नेली जात होती, याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत धनपाल गांधी (वय ४७, रा. लासूरणे, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून मोठ्या प्रमाणावर रोकड घेऊन जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी (ता. ८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वाहतूक शाखा, लोणी काळभोर पोलिस ठाणे, हडपसर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या युनिट पाच यांनी संशयित कार (क्रमांक एमएच १३ सीके २१११) ताब्यात घेऊन संबंधित व्यक्तीला हडपसर पोलिस ठाण्यात आणले.
कारमधील बॅगा तपासल्या. त्यावेळी बॅगांमध्ये तीन कोटी ४२ लाख ६६ हजारांची रोकड आढळून आली. ही रक्कम जप्त करून सीलबंद करण्यात आली आहे. तसेच, वाहन जप्त करण्यात आले आहे.याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, प्राप्तिकर विभागाला पुढील कारवाई करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान, प्रशांत गांधी यांनी ही रक्कम घरातून पुण्यातील लक्ष्मी रोड येथील महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेत कर्जापोटी भरण्यासाठी जात असल्याचे पोलिसांना सांगितले.