पुणे | फी माफीसह मुलींच्या समस्यांसाठी समिती स्थापन करा; चंद्रकांत पाटील यांची महाविद्यालयांना सूचना

Photo of author

By Sandhya


पुणे : महायुती सरकारने घेतलेल्या मुलींच्या फी माफीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. पाटील यांनी शुक्रवारी पुण्यातील गरवारे महाविद्यालयास अचानक भेट देऊन मुलींच्या फी माफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. फी माफीसह मुलींच्या समस्यांसाठी समिती स्थापन करा, या सूचनेसह राज्यातील १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचा मानसही पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी उच्चशिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव हे देखील उपस्थित होते. उच्चशिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे; यासाठी राज्य सरकारने व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एकूण ८४२ कोर्सेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती. उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरारी पथक नेमून विद्यार्थिनींच्या तक्रारींची दखल घेतली जात होती. या निर्णयाचा आतापर्यंत किती विद्यार्थिनींना लाभ झाला, याचा प्रत्यक्ष आढावा राज्याचे चंद्रकांत पाटील घेण्यास सुरुवात केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले उच्चशिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे मुलींचे उच्चशिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने मुलींचे व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षण पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मुलींनी देखील ३१ मार्चपर्यंत महाविद्यालयात शासनाने नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फी माफीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. जेणेकरून मुलींना या निर्णयाचा लाभ घेता येईल. विद्यार्थिनींच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासन यांची संयुक्त समिती स्थापन करावी, अशी सूचना पाटील यांनी केली.

१०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार

राज्यभरातील शंभर महाविद्यालयांना अशा प्रकारे अचानक भेट देऊन मुलींच्या फी माफीचा आढावा घेणार आहे. ‘कमवा आणि शिका’ तत्त्वावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा भत्ता वाढविण्याची मागणी काही विद्यार्थ्यांनी यावेळी केली असता, त्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी त्यांनी दिली.

Leave a Comment

You cannot copy content of this page