संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज पुण्यात आगमन होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ), तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री निवडुंगा विठोबा मंदिरात (नाना पेठ) येथे असेल.
दोन्ही मंदिरांमध्ये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी मंदिरांमध्ये पालखीचे आगमन झाल्यावर अभिषेक, पादुका पूजन आणि आरतीने पालख्यांचे स्वागत होणार आहे.
तसेच, त्यानंतर रात्रभर भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. दोन्ही मंदिरांमध्ये उत्सव मंडपाच्या उभारणीसह विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.
सोमवारी सायंकाळी 7 ते 8.30 च्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मुक्कामासाठी श्री पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ), तर संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामासाठी श्री निवडुंगा विठोबा मंदिरात (नाना पेठ) येणार आहे.
पालख्यांच्या आगमनाच्या वेळी मंदिरातील विश्वस्त आणि पदाधिकार्यांकडून स्वागत करण्यात येणार आहे. 12 आणि 13 जूनला दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात असणार आहे.
14 जूनला पहाटे दोन्ही पालख्या पुढील मार्गावर प्रस्थान करतील. श्री निवडुंगा विठोबा मंदिराचे (नाना पेठ) रवींद्र पाध्ये म्हणाले, ‘यंदा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मंदिरात वारकर्यांच्या निवासाची, जेवणाची व्यवस्थाही केली आहे. मंदिरात आगमन झाल्यावर पादुका पूजन होईल आणि मंदिरात पालखीचा प्रवेश होईल.’
संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.अंदाजे रात्री आठ वाजता पालखी मंदिरात मुक्कामासाठी येईल. पारंपरिक पद्धतीने पादुका पूजन आणि आरती होईल. त्यानंतर रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहील. दुसर्या दिवशी रात्रीही जागरण होईल. दिंडीप्रमुख आणि वारकर्यांच्या मुक्कामासाठीही व्यवस्था केली आहे.