पुणे : सातारा रस्त्यावरील डीमार्ट शेजारी इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईल शॉपीमध्ये दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की इमारतीच्या भिंतींना तडे बसले. दुकानातील सगळं सामानही जळून खाक झालं. या स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय.
एक व्यक्ती दुकानाचं शटर उघडत असताना तिथे मोठा स्फोट झाला. मात्र तो स्फोट कशामुळे झाला याचा तपास आणि अंदाज अजून कुठेही लागलेला नाहीये. म्हणूनच याचा तपास आता एटीएसमार्फत करणार असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुकानाचा मालक आणि एक व्यक्ती रात्री दुकानात होते.
मात्र दैव बलवत्तर म्हणून या दोघांचेही प्राण वाचले. सद्या ते ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. रात्री पावणे तीन वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली. अग्निशमन दलाकडून सहा फायरगाड्या, दोन वॉटर टँकर आणि एक रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या.
माहितीनुसार पुणे सातारा रस्त्यावर इंद्रायणी कॉम्प्लेक्सच्या देवयानी इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस अँड मोबाईल शॉपी दुकान नाव होतं. त्या दुकानाला आग लागली होती.
घटनास्थळी ०३ दुकानांमधे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. दुकान होम अप्लायन्स, दुकान किचन अप्लायन्स व दुकान मोबाईल शॉपी अशी दुकाने होती. घटनास्थळी गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तू होत्या.
याठिकाणी आग लागून स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीची मोठी पडझड झाली आहे. स्फोट इतका मोठा होता की दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते. एक दुचाकी पूर्णपणे जळाली.
दरम्यान, भीषण आगीत दोन नागरिक जखमी झाले असून यामधे एक इसम दुकानाचा मालक असल्याचे स्थानिकांकडून समजते. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली असून पुढील धोका टळलेला आहे