सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने कामाच्या ठिकाणी डंपर, क्रेन, जेसीबी यासह अवजड वाहने ये-जा करीत असतात तसेच लोखंडी सळयांना आकार देणे, वेल्डींग अशी कामेही होत आहेत. अशा कामांतून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काम सुरू असल्याकारणाने असे खड्डे बुजविता येत नसल्याने सिंहगड रस्त्याची ठिकठिकाणी चाळण झाली आहे.
पसरलेली खडी, चढ-उताराचे डांबरीकरण यामुळे वाहतूक अतिशय संथगतीने चालत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे दिसते.
शहरातून डेक्कन किंवा स्वारगेटकडून खडकवासला, धायरी, नऱ्हे, वडगाव, किरकटवाडी या भागात जाण्यासाठी सिंहगड रस्ता हा एकमेव आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर असा दोन हजार 120 मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला जात आहे.
यासाठी 118.37 कोटींचा निधी खर्च करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू असून आत्तापर्यंत सुमारे 43 टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु, हे काम करीत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांसाठीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. संपूर्ण रस्त्यावर अवजड कामांतून रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत.