वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी शहरात विविध विकास कामे सुरू असून, या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षा सायली रूपेश म्हाळसकर यांनी काल शहरातील सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी केली.
दरम्यान, नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण-2023 अंतर्गत शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी शहरातील संबंधित कामांची पाहणी केली.
या दरम्यान अनेक ठिकाणी रस्तालगत व परिसरात उघड्यावर कचरा फेकलेला आढळून आला. या अवस्थेत पडलेल्या कचर्यामुळे गावच्या सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे, याला पायबंद घालण्यासाठी सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकणार्या लोकांवर जरब बसावी, यासाठी कारवाई होणे आवश्यक आहे.
त्यादृष्टीने नगरपंचायतच्या माध्यमातून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुख्यधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पथक तयार करण्यात येणार असून नागरिकांनी यापुढे उघड्यावर कचरा न फेकता तो कचरागाडीत टाकावा, असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.