PUNE : रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा…

Photo of author

By Sandhya

रवींद्र धंगेकर

कसब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संस्थेकडून दिवाळीनिमित्त विविध वस्तू वाटप करण्यात येत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा धंगेकर यांच्या संस्थेविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त कसबा मतदारसंघातील नागरिकांना दिवाळीनिमित्त विविध वस्तू असलेल्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पिशवीवर धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीचे छायाचित्रे असून, मतदारांना प्रलोभन दाखविण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. त्यानंतर रविवारी रात्री निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

“दरवर्षी माझा मित्र परिवारआनंदाची दिवाळी भेट देतो. नागरिकांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. आचारसंहिता लागू केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे प्रलोभन किंवा वस्तुंचे वाटप करण्यावर बंधन आहे, याची जाणीव मला आहे. या उपक्रमात माझा व्यक्तिश: सहभाग नाही. मला अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही.

विरोधकांनी धास्तीने ही तक्रार केली आहे, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांचे वाटप कोण रोखणार, असा प्रश्न धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment