पुणे शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून गेल्या काही दिवसांत नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. “नो पार्किंग”मध्ये वाहन लावल्यास दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली.
“नो पार्किंग’मध्ये दुचाकी लावलेली असल्यास पहिल्यांदा कारवाईत टोइंगसह 785 रुपये तर चारचाकी वाहनांना 1074 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. परंतू, शहर तसेच उपनगरांतील विविध भागात वाढीव दंड आकारणीकडे दुर्लक्ष करीत चालक आपली वाहने “नो पार्किंग’मध्येच उभी करीत आहेत.
यातून वाहतूक पोलिसांच्या कार्यवाही बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून असा प्रकार म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेलाच आव्हान दिल्याची स्थिती आहे.
शहर तसेच उपनगरांतील मुख्य मार्गांलगत जागा मिळेल तेथे वाहने लावण्याचे प्रकार घडत असल्याने अशा मार्गांवर वाहतूक कोंडी होण्यामागे हेच कारण असल्याचे सांगितले जाते.
त्यामुळेच दुचाकी वाहनाने पहिल्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावलेले असल्यास टोइंगसह 776 रुपये तर दुसऱ्यांदा दंड झाल्यास 1786 रुपये दंड केला जाणार आहे तर चारचाकी वाहनांसाठी हाच दंड पहिल्यांदा नियम मोडणाऱ्यास 1071 तर दुसऱ्यांदा “नो पार्किंग’मध्ये वाहन लावल्यास 2071 रुपये दंड आकारला जाणार आहे.