पुणे – वाढत्या तापमानामुळे पुणेकर उघाड्याने हैराण झाले आहे. सलग तिसऱ्या दिवशी शहरातील कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे आहे. पुण्यात तळेगाव ढमढेरे येथे सर्वाधिक 42.6 तर शिवाजीनगर परिसरात 39.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
पुण्यात दिवसभर उन्हाचा चटका मध्येच ढगाळ वातावरण आणि पहाटे गारवा, असा अनुभव सध्या पुणेकर घेत आहेत. मागील 15 दिवस उष्णतेचा पारा कमी-अधिक होत असून चार दिवसांपूर्वी 35 अंशापर्यंत खाली आलेले कमाल तापमान आज 40 अंशाच्या पुढे गेले.
त्यामुळे दुपारी उन्हाच्या चटक्याने अंगाची काहिली होत आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरातील हवामान कोरडे राहिल, तर कमाल तापमान 42 अंशापर्यंत वाढेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
काही प्रमुख केंद्रावरील कमाल तापमान तळेगाव ढमढेरे 42.6, शिरूर 41.9, कोरेगाव पार्क 41.4, वडगावशेरी 41.3, पुरंदर आणि मगरपट्टा 40.8, चिंचवड 40.5, हडपसर आणि दौंड 40.1, पाषाण 39.8, शिवाजीनगर 39.8, एनडीए 39.6, हवेली 39. दुपारी रस्त्यावर शुकशुकाट… दुपारी 12 ते 4 दरम्यान रस्त्यावर उन्हाचा चटका जाणवत आहे.
रस्ते तापल्यामुळे दुचाकी किंवा पायी जाताना पायाला चटके आणि अंगाची लाहिलाही होत आहे. त्यामुळे चटका सोसण्यापेक्षा घरात किंवा कार्यालयात शांत बसण्यातच शहाणपण, त्यामुळे दुपारी रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी झाल्यामुळे काही रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळाले.