पुणेकरांची पाण्याची चिंता वाढली; खडकवासला प्रकल्पात 31 टक्के पाणीसाठा शिल्लक

Photo of author

By Sandhya

पुणेकरांची पाण्याची चिंता वाढली; खडकवासला प्रकल्पात 31 टक्के पाणीसाठा शिल्लक

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याची चिंता वाढली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी 17 जुलैपर्यंत धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे तब्बल 61 टक्के पाणीसाठा जमा झाला होता. सध्या 31 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांत मिळून सध्या 9.05 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 31.04 टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

गेल्या वर्षी 17 जुलैपर्यंत या चारही धरणांत मिळून एकूण 17.67 टीएमसी (60.62 टक्के) पाणीसाठा जमा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 8.62 टीएमसीने (28.58 टक्के) पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाण्याची चिंता वाढली आहे. यंदा विलंबाने पावसाचे आगमन झाले.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन झाले. सुरुवातीला संततधार पावसाने पुणेकर सुखावले. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली आहे. अद्यापही धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

दरम्यान, रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात 45 मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात अनुक्रमे 25 मिमी आणि 26 मिमी, तर खडकवासला धरणक्षेत्रात अवघ्या तीन मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

दिवसभरात टेमघर धरण परिसरात 20 मिमी, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या क्षेत्रात प्रत्येकी 15 मिमी आणि खडकवासला धरणक्षेत्रात दोन मिमी पाऊस पडला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Comment