पुन्हा एकदा नाना पटोले दिल्लीवारीला

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. कॉंग्रेसनेही जागांची चाचपणी करायला सुरुवात केली. तर दुसरीकडे मात्र कॉंग्रेस पक्ष अंतर्गत खांदेपालट सुरूच आहे. मुंबई अध्यक्ष बदलल्यानंतर आता प्रभारी बदलण्याची हालचाल सुरू आहे.

त्याच सोबत प्रदेश अध्यक्षपद टिकवण्यासाठी आणि बदलण्यासाठी दोन्हीही बाजूने जोरदार हालचाली सुरू आहे. त्याचमुळे राज्यातील कॉंग्रेस नेत्यांची दिल्लीवारी सुरू झाल्या आहेत.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेले दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी दिल्लीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा पटोले दिल्लीला गेले आहेत. पटोले यांना अध्यक्षपदावरून हटवावे यासाठी कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्लीमध्ये जाऊन सूर लावला होता.

पटोलेंची “एकला चलोरे’ भूमिका अडचण नाना पटोले “एकला चलोरे’च्या भूमिकेत आहेत म्हणून महाराष्ट्रातील काही नेते नानांच्या विरोधामध्ये आहेत. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल आणि प्रभारी एच.के. पाटील यांच्याशीही त्यांचे फार सख्ख्य नाही. पटोलेंच्या आक्रमक स्वभावामुळे महाविकास आघाडीतही त्यांचे संबंध फार चांगले नाहीत.

ही जरी नाना पटोले यांची कमकुवत बाजू असली तरी राहुल गांधींच्या नजरेत नाना पटोले यांची प्रतिमा अद्याप चांगली असल्याचे पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असताना नेतृत्वावर टीका करत त्यांनी राजीनामा दिला होता.

महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर विधानपरिषद आणि विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये कॉंग्रेसला चांगले यश मिळाले होते. पटोले यांच्यासाठी या सर्व बाजू असल्या तरी राज्यातील सत्तांतराच्यावेळी बहुमत चाचणीसाठी काही आमदारांची अनुपस्थिती यावरून हाय कमांड नाराज आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page