पुण्याच्या प्रश्नांविषयी अधिक माहिती अजित पवार यांनाच असल्याने त्यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार ) पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आहे,
अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली. या वेळी वैशाली नागवडे, हनुमंत कोकाटे, प्रदीप देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
गारटकर म्हणाले, राज्याच्या विकासासाठी अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे.
बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रश्न आगामी काळात कसे सोडविता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पुरंदर, दौंड आणि मुळशी तालुक्यांतील तालुकाध्यक्ष वगळता अन्य तालुक्यांतील तालुकाध्यक्ष या वेळी उपस्थित होते.
तालुकाध्यक्षांसह जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी, सहकारी संस्था, साखर कारखाने, बाजार समित्या, खरेदी-विक्री संघ, कात्रज दूध संघांचे पदाधिकारी उपस्थित होते, असेही गारटकर यांनी सांगितले.