दरोड्याचा तयारीत असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी देखील बचावासाठी गोळीबार केला. या थरारावेळी एका आरोपीने धारदार शस्त्र फेकून मारल्याने पोलिस शिपाई जखमी झाला आहे.
वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत एसबीआय बँकेच्या एटीएम वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कोयता टोळीच्या पाच आरोपींना गुन्हे शाखेने गोळीबार करत बेड्या ठोकल्या. याबाबतची माहिती पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
दिनांक 08 जुलै रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट ०३ चे अधिकारी व कर्मचारी हे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये म्हाडा वसाहतीमध्ये कोंबिंग ऑपरेशन करत असताना रोझरी स्कूल च्या जवळ आठ ते दहा इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आले.
नमूद संशयित आरोपींना सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे , युनिट 3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार व युनिट तीनचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिशेने जात असताना एका संशयित आरोपीने पोलीस पथकाच्या दिशेने पिस्तुल रोखले.
त्यानंतर आरोपींनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस पथकाने आरोपींच्या दिशेने फायरींग केले. यादरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एका आरोपीने पोलिस शिपाई कट्टे यांच्या दिशेने धारदार शस्त्र फेकून मारल्याने ते जखमी झाले. त्यानंतर पाच आरोपींना पळून जात असताना पकडले .
त्यानंतर इतर चार ते पाच आरोपी यांच्यावर पोलिसांच्या कडून फायरिंग केली असता ते आरोपी अंधारातून टेकडीच्या दिशेने पळून गेले. इतर आरोपींचा शोध चालू आहे. तसेच नमूद घटनेबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून एक गावठी कट्टा त्यामध्ये जिवंत चार राऊंड, दोन लोखंडी कोयते, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्या विरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तपासादरम्यान ते एसबीआय बँकेच्या एटीएम वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपआयुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे तसेच युनिट तीनच्या पथकाने ही कारवाई केली.