पुरंदरचा राजकीय रणसंग्राम तापला अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेसाठी १९ उमेदवार मैदानात

Photo of author

By Sandhya

Purandar’s political battle heats up after withdrawal of applications, 19 candidates in fray for Zilla Parishad



पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा राजकीय रणसंग्राम चांगलाच तापला असून, उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या मोठ्या प्रमाणावरील माघारींमुळे निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. चारही जिल्हा परिषद गटांमध्ये थेट लढती निश्चित झाल्या असून, येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्हा परिषद व पुरंदर तालुका पंचायत समितीच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होत असून, मंगळवारी (दि. २७) अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी पुरंदर तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघांतून तब्बल २१ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी १७ पक्षीय आणि २ अपक्ष असे एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उरले आहेत.
पंचायत समिती निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर माघारी झाल्या असून, दाखल अर्जांपैकी ५१ उमेदवारांनी माघार घेतली आहे. परिणामी आता ३३ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती जाणार आहे.
१६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली होती. २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी झाल्यानंतर तब्बल पाच दिवस अर्ज माघारीसाठी उपलब्ध झाल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या रणनीती राबवत मोठ्या प्रमाणावर माघारी घडवून आणल्या.
जिल्हा परिषद गटनिहाय चित्र
दिवे–गराडे गट :
या गटात माघारीनंतर आता तीन उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून दिव्या संदीप जगदाळे, शिवसेनेकडून ज्योती राजाराम झेंडे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली अमोल झेंडे यांच्यात थेट लढत होणार आहे.
बेलसर–माळशिरस गट :
या गटात पाच उमेदवारांनी माघार घेतली असून सहा उमेदवार मैदानात आहेत. भाजपचे अजय कैलास इंगळे, शिवसेनेचे रमेश रामचंद्र इंगळे, शिवसेना (उबाठा)चे अमोल दत्तात्रय कामठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव विजयराव कोलते, आम आदमी पक्षाचे शहाजी रत्नाकर कोलते आणि काँग्रेसचे दत्तात्रय मारुती झुरंगे यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित आहे.
वीर–भिवडी गट :
या गटात नऊ उमेदवारांनी माघार घेतली असून सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुष्कराज संजय जाधव, शिवसेनेचे समिर अरविंद जाधव, काँग्रेसचे नवनाथ चंद्रकांत माळवे, भाजपचे हरिभाऊ कुंडलिक लोळे, तसेच अपक्ष म्हणून अनिल लक्ष्मण धिवार आणि हेमंतकुमार भाऊसाहेब माहूरकर निवडणूक लढवत आहेत.
निरा–कोळविहीरे गट :
या गटात सहा उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर चार उमेदवार शिल्लक राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, भाजपच्या सीमा संदीप धायगुडे, काँग्रेसच्या सविता राजेंद्र बरकडे आणि शिवसेनेच्या भारती अतुल म्हस्के यांच्यात सामना रंगणार आहे.
एकूणच पुरंदर तालुक्यातील चार जिल्हा परिषद जागांसाठी विविध राजकीय पक्षांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली असून, प्रचाराला आता वेग आला आहे. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, त्यामुळे पुरंदरचे राजकारण आणखी तापणार हे निश्चित आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page