चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात ‘पुष्पा’ हजर, अल्लू अर्जुनची चौकशी

Photo of author

By Sandhya


चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात ‘पुष्पा’ हजर! थोड्याच वेळात अल्लू अर्जुनची चौकशी

४ डिसेंबर रोजी पुष्पा २ च्या प्रीमियरच्या वेळी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला मंगळवारी सकाळी ११ वाजता चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. याप्रकरणी अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. परंतु, हैदराबाद पोलिसांनी सोमवारी अभिनेता अल्लू अर्जुनला नवीन समन्स बजावले. या समन्सनंतर अल्लू अर्जुन आज हैदराबाद पोलिसांसमोर हजर झाला.
संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरण
पुष्पा २ च्या प्रीमियर दरम्यान, हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिच्या मुलावर अजूनही रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती आणि तो एक रात्र कारागृहातही होता. सध्या तो जामिनावर सुटला आहे. या घटनेला तेलंगणात राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणाबाबत काँग्रेस सरकारवर, “चित्रपट कलाकारांवर मुद्दाम कारवाई केली जात आहे” असा आरोप भाजप आणि बीआरएसने केला आहे.
तोडफोड करणाऱ्या ६ जणांना अटक
चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेला न्याय देण्याची मागणी करत काही आंदोलकांनी पुष्पा २ स्टार अल्लू अर्जुनच्या मालमत्तेचे नुकसान केले होते. यानंतर आंदोलनात सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र, सोमवारी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

Leave a Comment