राहुल गांधी : “मोदी भ्रष्टाचाराची शाळा चालवतायत, ज्याची किंमत देशाला…”

Photo of author

By Sandhya

राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराचीच शाळा चालवत असून ते या शाळेत एन्टायर करप्शन सायन्स हाच एकमेव विषय शिकवत आहेत’, असा आरेाप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच  केंद्रीय यंत्रणांच्या छाप्यांमधून भाजप देणगी गोळा करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राहुल गांधींनी काँग्रेसच्या एका नवीन जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

मोदींच्या या भ्रष्टाचाराच्या शाळेत भ्रष्टाचाराच्या विषयाचा प्रत्येक अध्याय तपशीलाने शिकवला जात आहे असा आरोपही त्यांनी केला. छापे टाकून देणगी कशी गोळा केली जाते आणि देणग्या घेतल्यानंतर सरकारी कंत्राटाचे वाटप कसे केले जाते, याचे धडे पंतप्रधान शिकवत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

भ्रष्टाचाऱ्यांना धुणारी वॉशिंग मशीन कशी चालते?केंद्रीय संस्थांना रिकव्हरी एजंट बनवून जामीन आणि जेलचा खेळ कसा खेळला जातो, याचेही प्रशिक्षण मोदी देत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

‘भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा’ बनलेल्या भाजपने आपल्या नेत्यांसाठी हा ‘क्रॅश कोर्स’ अनिवार्य केला आहे आणि त्याची किंमत देश चुकवत आहे. इंडिया आघाडी सत्तेवर आल्यावर भाजपची ही भ्रष्टाचाराची शाळा कायमची बंद केली जाईल असाही दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.

Leave a Comment