राहुल गांधी : मोदींनी पद्धतशीरपणे देशातील रोजगार व्यवस्था संपवली…

Photo of author

By Sandhya

राहुल गांधी

कॉंग्रेसे नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक तोफ डागली. देशातील रोजगार व्यवस्था मोदींनी पद्धतशीरपणे संपवल्याचा आरोप त्यांनी केला.

केंद्राप्रमाणेच हरियाणात सत्तेवर असणाऱ्या भाजपने संबंधित राज्यही उद्धवस्त केले, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले. ते हरियाणातील कॉंग्रेसच्या प्रचार सभेत बोलत होते. राहुल यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. त्या दौऱ्यात हरियाणातील काही तरूणांच्या भेटीविषयीचा अनुभव त्यांनी सांगितला.

हरियाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने त्यांनी चांगले भविष्य घडवण्यासाठी अमेरिका गाठली. एका खोलीत १५ ते २० तरूण राहत असल्याचे मला आढळले. अमेरिकेत पोहचण्यासाठी त्यांना मोठ्या दिव्यातून जावे लागले.

कझाकस्तान, तुर्किए, इतर काही देशांतून आणि पनामाच्या जंगलातून धोकादायक प्रवास करावा लागला. त्यांना माफियांनी लुटले. अमेरिकेत पोहचण्यासाठी किमान ३५ लाख रूपये खर्च करावे लागतात. काहींनी अवाच्यासवा व्याजावर कर्ज घेतले, तर काहींनी जमिनी विकल्या.

तेवढ्या रकमेत हरियाणात व्यवसाय करता येऊ शकला असता असा मुद्दा मी त्या तरूणांपुढे मांडला. मात्र, त्यापेक्षा अधिक रक्कम खर्च करूनही हरियाणात व्यवसाय करणे व्यवहार्य ठरत नाही. आमच्यापैकी एकाला तशा प्रयत्नात अपयश आल्याचे त्यांनी सांगितले.

चुकीच्या जीएसटी प्रणालीतून केंद्र सरकार छोटे व्यवसाय संपवत आहे, असा आरोप राहुल यांनी केला. तरूण गरीब असेल तर त्याला बँक कर्ज मिळत नाही अन्‌ तो व्यवसायही सुरू करू शकत नाही.

तरूणांसाठी रोजगार उपलब्ध नाहीत. ते लष्करात दाखल होऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी एकापाठोपाठ एक दरवाजे बंद होत आहेत, असा दावा त्यांनी केला. केंद्रीय कृषी कायदे, महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ या मुद्द्यांवरूनही त्यांनी भाजपला लक्ष्य केले.

हरियाणात कॉंग्रेसचे वादळ आले आहे. विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवून आमचा पक्ष सरकार स्थापन करेल, असा विश्‍वास राहुल यांनी व्यक्त केला. त्यांच्या सभेत कॉंग्रेसमधील ऐक्याचे दर्शन घडले. माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा आणि त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक असणाऱ्या खासदार कुमारी सेलजा यांच्यासह प्रमुख नेते त्या सभेला उपस्थित होते.

Leave a Comment