
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवारी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप पक्षावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ पुतळा नसून एक विचारधारा आहे.
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या विचारसरणीला आणि त्याच्या कृतीला मनापासून पाठिंबा देतो तेव्हा एक मूर्ती तयार होते. पण भाजपला शिवरायांचे विचार मान्य नाहीत.’ असेही ते म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना आपणही शपथ घेतली पाहिजे की, शिवाजी महाराज ज्या प्रकारे आयुष्य जगले आणि ज्या गोष्टींसाठी लढले, त्या गोष्टींसाठीही आपण लढले पाहिजे. आज ही विचारधारेची लढाई आहे जी महाराज्यांसाठी लढली पाहिजे. भाजपने शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला पण तो काही दिवसांनी खाली पडला. असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
दरम्यान, सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आज राहुल गांधी यांनी कोल्हापुरात यावरून भाजप पक्षावर निशाणा साधला.
भाजप शिवाजी महाराजांची विचारधारा मानत नाही. हे लोक 24 तास विचारधारेच्या विरोधात काम करतात. आमचा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे. आमचा लढा विचारधारेचा आहे. शिवाजी महाराजांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई लढली आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली.
आम्ही त्यांच्या मार्गावर चालत राहू आणि लोकांच्या ‘न्याय हक्कासाठी’ लढत राहू. शिवाजी महाराज-राहुल यांच्या विचारावर आधारित राज्यघटना तयार झाली देश सर्वांचा आहे, सर्वांना बरोबर घेऊन चालावे लागेल, अन्याय होता कामा नये, हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
आज ‘संविधान’ हे शिवाजी महाराजांच्या विचाराचे प्रतीक आहे. संविधान ही शिवाजी महाराजांच्या विचारावर आधारित आहे, कारण त्यात त्यांनी आयुष्यभर लढा दिलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.