जातिनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागच्या काही दिवसांपासून कमालीचे आक्रमक आहेत. दरम्यान, सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी भारतातीलआरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार,
या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोठं विधान केलं आहे. जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने समानता असेल, तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल. सध्यातरी अशी स्थिती नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित अशा जॉर्जटाऊन विद्यापीठामधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेव्हा एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना भारतातील आरक्षणाबाबत प्रश्न विचारला होता.
तसेच ते कधीपर्यंत सुरू राहील, अशी विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने निष्पक्षता असेल, तेव्हा आम्ही आरक्षण रद्द करण्याबाबत विचार करू.
सध्यातरी भारत हा याबाबतीत निष्पक्ष ठिकाण नाही आहे. तुम्ही वित्तीय आकडे पाहिल्यास आदिवासींना १०० रुपयांमधील १० पैसे मिळतात. दलितांना १०० रुपयांमधील ५ रुपये मिळतात. तर ओबीसींनाही एवढेच पैसे मिळतात. त्यांना योग्य भागीदारी मिळत नाही आहे, हे वास्तव आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, समस्या ही आहे की, भारतातील ९० टक्के लोक भागीदारी करण्यास सक्षम नाही आहेत. भारतातील प्रत्येक व्यवसायातील व्यावसायिकांची यादी पाहा. मी पाहिली आहे. त्यात मला एका आदिवासीचं नाव दाखवा. दलिताचं नाव दाखवा. पहिल्या २०० जणांमधील एक ओबीसी आहे.
त्यांची भारतातील संख्या ही ५० टक्के आहे. मात्र आम्ही या आजारावर उपचार करत नाही आहोत. ही समस्या दूर करण्यासाठी केवळ आरक्षण हेच साधन नाही आहे, इतर मार्गही आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.