विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचा असेल; मात्र २०२९ मध्ये मनसेचा मुख्यमंत्री होईल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी येथे केला.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांना शिंदे गटाने अजूनही पाठिंबा दिलेला नाही.
शिंदे गटाचे उमेदवार आ. सदा सरवणकर यांनी अमितसाठी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यावर नाराजी व्यक्त करत राज म्हणाले, प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षाला जी गोष्ट कळते ती सगळ्यांनाच कळेल, असे नाही. बाकी प्रत्येकाचे मिळेल ते ओरबडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईचा मतदारसंघ मनसेला देण्यास शिंदे गटाने नकार दिला होता. उलट मनसेने धनुष्यबाण चिन्ह घेऊन हा मतदारसंघ लढवावा, अशी अट घातली होती. हा संदर्भ ताजा करत राज म्हणाले, दक्षिण मुंबईची जागा आम्ही लढवली असती, तर शंभर टक्के जिंकलो असतो; पण मला सांगितले की, आमच्या निशाणीवर लढवा! मी कमावलेली निशाणी आहे.
ढापलेली निशाणी नाही. लोकांच्या मतदानातून माझी निशाणी मला मिळाली, असा टोलाही राज यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना हाणला. पक्ष फुटण्याला माझा आक्षेप नाही. मात्र, पक्षाचे नाव, चिन्ह घेणे योग्य नाही, अशा शब्दांत आपली भूमिका मांडत राज म्हणाले की, अजित पवारांनी पक्षाचे नाव, घड्याळ चिन्ह घेणे मला योग्य वाटत नाही.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही बाळासाहेब ठाकरेंची कमाई आहे. तुम्ही ४० आमदार घेऊन गेलात, हे फोडाफोडीचे राजकारण समजू शकतो. मात्र, पक्षाचे नाव आणि चिन्ह घेण्याच्या प्रक्रियेला माझा विरोध आहे.