राज ठाकरे : शिवसेना आणि धनुष्यबाण फक्त बाळासाहेबांची प्रॉपर्टी…

Photo of author

By Sandhya

राज ठाकरे

राष्ट्रवादीसोबत गेल्यावर सर्व फोटोंवरून बाळासाहेब ठाकरेंच्या आधीचे हिंदूहृदयसम्राट हे विशेषणच काढून टाकले. शिवसेनेच्या होर्डिंगवर बाळासाहेबांचा फोटो असायचा, पण हिंदूहृदयसम्राट लिहिलेलं नसायचे. उर्दू होर्डिंग्जवर तर चक्क बाळासाहेबांच्या नावापुढे जनाबचा उल्लेख केल्याचा गौप्यस्फोट करून राज ठाकरे यांनी भर सभेत करत खळबळ उडवून दिली.

डोंबिवलीत पी अँड टी कॉलनीतील श्री महावैष्णव मारूती मंदिरासमोरच्या चौकात सोमवारी (दि.४) सायंकाळी मनसेचे नेते प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्यासह मनसेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ राज ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू पाटील यांचे ज्येष्ठ बंधू तथा माजी आमदार रमेश पाटील यांनी वाढवला.

यावेळी मनसेचे उमेदवार राजू पाटील, उल्हास भोईर, संगीता चेंदवणकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विनोद पाटील, माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याणच्या शहराध्यक्षा कस्तुरी देसाई, डोंबिवलीच्या शहराध्यक्षा मंदा पाटील, शहराध्यक्ष राहूल कामत, मनोज घरत, दीपिका पेडणेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणाचा अक्षरश: विचका झाला आहे.

विधानसभेत राजू पाटील हा माझा केवळ एकच आमदार होता. तो विकणारा नव्हे, तर टिकणारा निघाला, याचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याच्या सद्य:स्थितीवर टिकास्त्र सोडले. माझा एकच आमदार होता. माझी निशाणी घेऊन गेला असता पण असले विचार माझ्या नेत्यांच्या मनाला कधी शिवतही नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना नाव न घेता लक्ष्य केले.

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सभा घेणाऱ्या राज ठाकरे यांनी त्यांच्यावरही तोफ डागली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरुद्ध निवडणूक लढलो आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणत त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वर्षभराने अजित पवार त्यांच्याच मांडीवर येऊन बसले. त्याचे त्यांना काहीच वाटत नाही. कारण या पक्षांनी मतदारांना गृहित धरलं आहे. तुम्ही चिडत नाही. तुम्हाला काहीच वाटत नाही.

लोण्याच्या गोळ्यासारखे तुम्ही झाले आहात. त्यामुळे आपण काहीही केले तरी चालते, असा यांचा समज झाला आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मतदारांना डोळसपणे मतदान करण्याचे आवाहन केले. मुंबईमध्ये कुर्ल्यात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा झाली. त्या सभेतील एक क्लिप मी पाहिली.

व्यासपीठावर शिंदेंचा फोटो, त्यांच्या उमेदवारांचे नाव आणि मंचावर एक तरुणी भोजपुरी गाण्यावर नाचतेय. हीच का तुमची लाडकी बहीण योजना ? असा सवाल उपस्थित करून राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा बट्ट्याबोळ करणाऱ्ऱ्यांवर आसूड ओढला. राजकीय व्यासपीठांवर बायका नाचवण्याचे प्रकार उत्तर प्रदेश, बिहारमध्ये घडतात. आपल्याला महाराष्ट्राचा यूपी, बिहार करायचाय, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा, मनसे, कुणीही असूदे, कोणताही राजकीय पक्ष या सगळ्यांपेक्षा महाराष्ट्र मोठा असून कोणताही पक्ष टिकला नाही टिकला हे महत्त्वाचे नाही. महाराष्ट्र टिकला पाहिजे. आताच्या या घाणेरड्या राजकारणापासून महाराष्ट्राला वाचवणे गरजेचे सांगत राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर आसूड ओढले.

ज्या महाराष्ट्राने अटकेपार झेंडे रोवले, ज्या महाराष्ट्राकडे एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून पाहिले जायचे त्याच महाराष्ट्रात असली दशा ? या गोष्टी तर उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये होत असल्याचे सांगत हीच का लाडकी बहीण योजना ? असा संतप्त सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी या प्रकराकडे वैयक्तिक लक्ष घालण्याची सूचना केली.

तसेच आपण आज केवळ आपल्याशी संवाद साधायला आलो असून पुन्हा 15 नोव्हेंबरला याच ठिकाणी येणार असल्याचे सांगितले. तर मनसे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर तुफान हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकीला आपण केवळ राज ठाकरे यांनी आपल्याला सांगितल्यामुळेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मदत केल्याचा गौप्यस्फोट केला.

Leave a Comment