मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या भांडुपमध्ये उमेदवार शिरीष सावंत यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी शिरीष सावंत यांच्या उमेदवारीवरुन पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी ते बाहेरचे असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना शिरीष सावंत हे आपलेच आहे.
ते युपी बिहारचे आहेत का? उगाच आपल्या लोकांना बाहेरचे म्हणू नका, असं म्हटलं. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांच्या केलेल्या तपासणीवरूनही भाष्य केलं.
उद्धव ठाकरेंच्या बॅगेत हात रुमाल आणि कोमट पाण्याशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला. “काल आणि आज उद्धव ठाकरेंची बॅग तपासली.
खरं तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कुठं काय तपासावं हेसुद्धा कळत नाही. ज्या व्यक्तीच्या हातातून कधी पैसे सुटला नाही, त्या व्यक्तीच्या बॅगेत काय असणार आहे? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी, याशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही.
उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर आता त्याचा मोठा बाऊ केला जातो आहे. मुळात बॅग तपासण्यात गैर काय? अनेकदा आमच्याही बॅगा तपासण्यात आल्या. निवडणूक अधिकारी त्यांचं काम करत असतात. त्याचा एवढा तमाशा करायची गरज काय. त्यातही ते संबंधित अधिकाऱ्यांचा व्हिडीओ काढतात.
त्याला नियुक्त पत्र दाखवायला सांगतात. कोणताही अधिकारी नियुक्ती पत्र खिशात घेऊन फिरतो का? कुणाला काय विचारावं, हेही उद्धव ठाकरेंना माहिती नाही. त्यांना फक्त मला मुख्यमंत्री करा बाकी तेल लावत गेलं. या लोकांनी सगळा तमाशा करून ठेवला आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.