‘मी नाशिकला का येत नाही, तर नाशिककरांनी मतदान केले म्हणून नाही तर तुमच्या गटबाजीमुळे वीट आला आहे. एकमेकांचे पाय ओढणे बंद करा, नाही तर मला नाशिक ऑप्शनला टाकावे लागेल.
उठसूट मुंबईत गाऱ्हाणे घेऊन येता, तुम्हाला आता शेवटचे इंजेक्शन द्यायला आलोय,’’ अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यासपीठावर व पहिल्या रांगेतील खुर्च्यांवर बसलेल्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून बोल सुनावले.
मनसे अध्यक्ष ठाकरे यांचे गुरुवारी नाशिकमध्ये आगमन झाले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांनी शाखा अध्यक्ष, विभागप्रमुख, महिला आघाडीचे अध्यक्ष यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी खबर बाहेर जाता कामा नये, असा सज्जड दम दिला.
मी नाशिकला का येत नाही, असा सवाल उपस्थितांना विचारला. सत्ताकाळात कामे करूनही नाशिककरांनी मतदान केले नाही म्हणून आपण नाराज आहात, असे सांगितल्यावर त्यास नकार दिला.
दुसऱ्या एकाने गटबाजीमुळे आपण येत नाही, असे सांगताच ‘बरोबर’ असे उत्तर देत राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत शाब्दिक दांडपट्टा सुरू केला. सभागृहात पाच ते सात मिनिटे शांतता होती.
राज ठाकरे व्यासपीठ व समोरील खुर्च्यांवर बसलेल्या पदाधिकाऱ्यांकडे बघून बोलत असल्याने त्यांचा रोख थेट पदाधिकाऱ्यांवरच असल्याचे स्पष्ट झाले.
तालुकानिहाय दौरा करणार या वेळी पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा सूर लावला. ग्रामीणमध्ये नेतृत्व नाही. पक्षाचे मोठे आंदोलन उभे राहिले नाही. अनेक संस्थांमध्ये संधी असूनही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळत नाही, आदी तक्रारी करण्यात आल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांत तालुकानिहाय दौऱ्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले.