महाराष्ट्रात ज्या प्रकारचे राजकारण झाले, ते संतापजनक आणि घाणेरडे आहे. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारी ही घटना आहे. त्याविरोधात घराघरांत संतापाची भावना असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केली.
राज्यातील राजकीय घडामोडी, पक्षांतर आणि युती-आघाड्यांच्या नव्या समीकरणांविरोधात मनसेने ‘एक सही संतापाची’ मोहीम चालविली आहे. दादरमध्ये निषेधाच्या सहीसाठी लावलेल्या फलकाच्या ठिकाणी राज ठाकरे यांनी हजेरी लावली.
ठाकरे म्हणाले, इथे जो प्रतिसाद दिसतोय, तो प्रातिनिधिक आहे. तुम्ही घराघराचा कौल घेतला तर प्रत्येक घरात संताप आहे. सध्या ज्या तडजोडी सुरू आहेत, त्याचे मला आश्चर्य वाटत नाही. आधी भांडतात, मग एकत्र येतात. यामुळे जे नुकसान व्हायचे ते झाले आहे.
भविष्यातल्या पिढ्यांसाठी, ज्यांना राजकारणात यायचे आहे त्यांच्या ताटात काय वाढतोय, हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे? हेच राजकारण असेल, तर महाराष्ट्राचे राजकारण कुठे चाललंय याचा विचार करतोय का? सत्ता आणि स्वार्थाचे हे राजकारण घाणेरडे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, सोमवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाबद्दल काय अपेक्षा आहेत, या प्रश्नावर ‘घंटा’ असे उत्तर राज यांनी दिले.