राज ठाकरे : राजकीय विचक्यातून राज्याला बाहेर काढा…

Photo of author

By Sandhya

राजकीय विचक्यातून राज्याला बाहेर काढा

’महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे. त्यावरून एकाने महापालिका निवडणुका 2025 मध्ये होतील, असे सांगितले. राजकीय विचक्यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे,’ असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.

कात्रज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मनसेच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणी करण्याची जबाबदारी माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

मोरे यांच्या कार्याचे ठाकरे यांनी या वेळी कौतुक केले. या मतदारसंघातील आठ तालुक्यांतील मनसे पदाधिकार्‍यांना जबाबदारीचे वाटप केले. या वेळी अजित पवार नावाच्या तरुणावर हवेली तालुक्याची जबाबदारी देण्यात आली.

यावरून राजकीय फिरकी घेत ठाकरे यांनी बारामतीत अजित पवार सापडावा हा योगायोग असल्याचे सांगत आता फक्त मला काका म्हणू नको, अशी टिप्पणी केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांत हास्यकल्लोळ निर्माण झाला.

या वेळी बाबू वागस्कर, दिलीप धोत्रे, अ‍ॅड. सुधीर पाटसकर, अ‍ॅड. विनोद जावळे, किशोर शिंदे, नितीन जगताप, मंगेश रासकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page