राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी चालविली असली, तरी पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील आमदारांनी यशवंतराव चव्हाण सेंटर तसेच ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी त्यांची भेट घेतली. बुधवारी दिवसभर नेते, पदाधिकार्यांचे बैठकीचे सत्र सुरू होते. या पेचावर येत्या 5 मे रोजी पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. मात्र, जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता, तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केला असता, असे त्यांनी स्पष्ट करतानाच, 5 मे रोजी अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी नेमलेली समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल,
असे शरद पवार यांनी नेत्यांकडे स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीतील हा सस्पेन्स आणखी दोन दिवस तरी कायम राहणार आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला.
शरद पवार यांनी मंगळवारी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर करून राजकीय वर्तुळात हलकल्लोळ उडवून दिला. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी चालविली आहे. त्यासाठी मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आदींनी राजीनामे देत दबाव वाढविला आहे.
मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. शरद पवार बुधवारी सकाळी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे उपस्थित होते. या ठिकाणी ते जवळपास तीन तास होते. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी प्रमुख नेत्यांनी भेट घेत त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून आग्रह धरला.
त्याचवेळी बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचा जयघोष करत निर्णय मागे घेण्याची मागणी करत होते. मात्र, शरद पवार पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर ‘सिल्व्हर ओक’ला परतले. त्यामुळे शरद पवार यांच्या राजीनाम्याचे नाट्य दुसर्या दिवशीही कायम राहिले. त्यावर शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे दोन दिवस जाऊ द्या. कदाचित त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करतील, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.