राजू शेट्टी : अन्यथा मुंबईचा दूधपुरवठा थांबवू…

Photo of author

By Sandhya

राजू शेट्टी

राहुरी शहरातील नगर-मनमाड रस्त्यावरील बाजार समितीसमोर दूध दराचा प्रश्न तसेच शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहिर करावी, या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलनात शेतकर्‍यांचा संताप दिसून आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अधिवेशनात मागण्या मान्य न केल्यास मुंबईसह मोठ्या शहरात शेतकर्‍यांचा दूध पुरवठा होऊ देणार नसल्याचा ईशारा दिला. तर आ. प्राजक्त तनपुरे यांनीही राज्य शासनावर आसूड उगारत अनुदानासाठी जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली.

दरवाढीची नौटंकी शेट्टी म्हणाले, दूध उत्पादकाचे आंदोलन पाहता दर वाढीची नौटंकी केली आहे. मागील अनुदानावर ब्र शब्द न काढता पुन्हा अनुदानाची घोषणा करून ही फसवणूक सुरू आहे.

बड्या उद्योजकांना कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी करणार्‍या केंद्र व राज्य शासनाने आता शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी, दुधाला विनाअट 40 रुपये प्रतिलिटर दर करावा,अशी मागणीही त्यांनी केली.

मर्जीतल्या कारखान्यांना मदत : तनपुरे आ. प्राजक्त तनपुरे यांनीही शासनाचे वाभाडे काढले. मर्जीतल्या कारखान्यांना मदत तर इतर कारखान्यांना त्रास देण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहेत.

दुधाच्या बाबत लोकसभेत फटका बसल्यानंतर योग्य निर्णय न घेता अटी शर्तीच्या माध्यमातून शेतकर्‍यांची फसवणूक सुरू आहे. पिक विम्यासह अनुदान देण्याबाबत तोंडाला पाने पुसली आहेत.

शासन शेतकर्‍यांची एकप्रकारे थट्टा करीत असल्याची टिका आ . तनपुरे यांनी केली. पै. रावसाहेब खेवरे, रविंद्र मोरे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन संतोष आघाव यांनी केले.

Leave a Comment