भाजपचा खरोखरच पराभव व्हावा असे महाविकास आघाडीला वाटत असेल तर त्यांनी हातकणंगले मतदार संघात मला पाठिंबा द्यावा. मी महाविकास आघाडीत जाणार नाही. शिवसेना पक्ष पाठिंब्यासाठी सकारात्मक आहे.
मात्र अजूनही राष्ट्रवादी पक्षात काही भाजपप्रेमी लोक आहेत, तेच यामध्ये अडथळे आणत आहेत, असा आरोप स्वाभिमानी पक्षाचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. राजू शेट्टी म्हणाले, एप्रिल २०२१ ला महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय राज्य कार्यकारणीने घेतला.
त्यामुळे पुन्हा आघाडीत जायचे असेल तर राज्य कार्यकारणीची बैठक बोलवावी लागेल. सध्या तरी आघाडीत जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विचार नाही.
शेतकरी विरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजप पक्षाचा पराभव करण्यासाठी आम्ही आघाडीसोबत राहायला तयार आहे. त्यांनाही खरोखरच भाजपचा राज्यात पराभव व्हावा, असे वाटत असेल तर त्यांनी पाठिंब्याचा लवकर निर्णय घ्यावा.
नाहीतर स्वबळावर आम्ही निवडणूक लढविण्याची तयारी केलीच आहे. ते म्हणाले, हातकणंगले मतदार संघ शिवसेनेकडे राहिल. शिवसेनेने येथे उमेदवार न देता मला पाठिंबा द्यावा, यासाठी मी दोनदा उद्धव ठाकरेंना भेटलो आहे. त्यांनी पाठिंब्याची तयारीही दाखवली होती. मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पक्षात अजूनही काही भाजपप्रेमी लोक आहेत.
ते आघाडीत राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करीत आहेत. हेच लोक मला शिवसेनेचा पाठिंबा मिळू नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. आघाडीचा पाठिंबा मिळाला नाही तरी आपण अपक्ष मैदानात असणारच आहे.
निवडणुकीचा प्रचारही चालू केला आहे. मतदारसंघात जनतेचा चांगला पाठिंबाही मिळत आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निश्चितच आपण मैदान जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.