राज्यातील सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी चळवळीची पार्श्वभूमी असलेले छोटे-छोटे पक्ष एकत्रित येऊन विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सत्तेवर येण्यासाठी नाही तर सत्ताधार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी या निवडणुका सर्व संघटना एकत्रित येऊन लढविणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.
गुरुवारी (दि. 19) पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक बोलविली आहे. या बैठकीस माझ्यासह स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे, प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, माजी आमदार वामनराव चटप, शंकरराव धोंडगे यांच्यासह प्रमुख शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
निवडणुकीत आश्वासक चेहरा देऊन आणि व्यापक आघाडी करुन आम्ही सामोरे जाणार आहोत. त्यामध्ये माजी सैनिकांच्या संघटनेचाही समावेश असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन चढाओढ लागल्याबद्दल छेडले असता ते म्हणाले, यातील कोणाचीही सत्ता आली तरी शेतकर्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे आम्हांला सत्ता नकोय, पंरतु सत्ताधार्यांवर अंकुश आणण्यासाठी आम्ही जनतेची ताकद उभी करुन चांगले लोकप्रतिनिधी निवडून देणार आहोत.
माणसे घडविणे माझे काम असून ते मी करीत राहणार, असेही ते यावेळी म्हणाले. सरकार लाडकी बहीण योजनेसारखी जाहिरात करीत असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, वीजबिल माफीची घोषणा होऊनही शेतकर्यांना थकबाकीच्या नोटिसा आजही येत आहेत. लाडकी बहीणप्रमाणे लाडका भाऊ योजनाही सरकारने आणावी.
सोयाबीनचे भाव क्विंटलला नऊ हजार रुपयांवरुन चार हजारांपर्यंत खाली आले असून शेतकर्यांना सर्व समजते. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र अग्रस्थानी असल्याची जाहिरातही सरकारने दयावी.
एक देश एक इलेक्शन हा प्रस्ताव बातम्या येण्यापुरताच मांडला जातो. मग आता झालेली लोकसभा इलेक्शन पुन्हा घेणार का? या प्रस्तावाला काही अर्थ नसल्याचेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.