राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान अशा सर्व प्रकारच्या धरणांमध्ये मिळून अवघा 19 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 25 धरणे कोरडीठाक पडली असून 37 धरणांमधील पाण्याने तळ गाठला आहे. अन्य धरणांत अत्यल्प पाणीसाठा आहे. आणखी आठ-दहा दिवस पाऊस लांबला, तर राज्याच्या घशाला कोरड पडणार आहे.
राज्यातील 139 मोठ्या, 260 मध्यम आणि 2594 लहान अशा 2993 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 48017.62 दशलक्ष घनमीटर (1695.71 टीएमसी) एवढी आहे.
मात्र, या सर्व धरणांत मिळून 9282.97 दशलक्ष घनमीटर (327.82 टीएमसी) एवढाच म्हणजे केवळ 19 टक्के पाणीसाठा दि. 21 पर्यंत शिल्लक होता.
सध्या राज्यातील खडकपूर्णा, बोरगाव-ऐनापूर, शिरसमार्ग, वांगदरी, सिद्धेश्वर, गुंजरगा, किल्लारी, लिंबाळा, मदनसुरी, राजेगाव, सीना-कोळेगाव, तगरखेडा, भुसनी, बिंदगीहाळ, कर्सा-पोहरेगाव, साई, टाकळगाव-देवळा, भाम, तीसगाव, वाकी, दूधगंगा, पिंपळगाव-जोग, घोड, लोणावळा आणि उजनी ही धरणे एक तर कोरडीठाक पडली आहेत किंवा त्या धरणातील पाणी मृतसंचय पातळीच्या खाली गेले आहे.
परिणामी, या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या अनेक गावांमध्ये ‘पाणीबाणी’ निर्माण झाली आहे. परिसरातील बहुतांश नद्यांवर उपसाबंदी लागू केली आहे.
आपेगाव, धानेगाव, डोंगरगाव, रोशनपुरी, आगदुरा, दिगडी, हिरडपुरी, जोगळादेवी, किनवट, लोणीसावंगी, मांगरूळ, मुदगल, राजटाकळी, औरद, खुलगापूर, नागझरी, शिवनी, वांजरखेडा, कावडस, डोलनहाळ, लोअरचोंधे, घाटघर, कालीसरार, सिदपूर, नंद, मुसळवाडी, भावली, चंकपूर, कडवा, पालखेड, वाघर, तिल्लारी, तुळशी, नीरा-देवधर, वडज, टेमघर, वलवण आणि कुंडली या धरणानेही तळ गाठला आहे.
आगामी काही दिवसांमध्ये पाऊस झाला नाही, तर ही धरणेसुद्धा कोरडी पडण्याचा धोका आहे.