
केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील तीन इंजिनच्या सरकारविरोधात जन-माणसात प्रचंड संताप आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांचा गट फुटून भाजप युतीत सहभागी झाला.
ही बाब कॉंग्रेससाठी पोषक ठरणार असून येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेस आघाडीला १४५ च्या वर जागा मिळून आम्ही बहुमत सिद्ध करु, असा आशावाद कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी भंडारा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांना हात घालत सांगितले की, राज्य शासनाने यावर्षीच्या उन्हाळी धानाची खरेदी उशिरा सुरू केली. त्याचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.
दरम्यानच्या काळात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्याचीही भरपाई दिलेली नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांच्या प्रोत्साहन राशीची अद्याप प्रतीक्षाच आहे. महाविकास आघाडी सरकारने सतत दोन वर्ष धान उत्पादक शेतकºयांना सातशे रुपयांचे बोनस दिले.
परंतु, त्यानंतर सरकार बदलताच १५ हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन शेतकºयांची बोळवण केली. यावरुन राज्यातील भाजपप्रणित सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येते. बोगस खते, बियाणे, औषधी कंपन्या या भाजप आमदारांच्या हितसंबंधातील व्यक्तींच्या असून या कंपन्या अजूनही बाजारात कशा आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राज्यासह भंडारा जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत, याला सरकारचे शेतकरीविरोधी धोरण कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. राज्यात होत असलेल्या विविध शासकीय पदांची भरती प्रक्रिया खासगी कंपन्यांमार्फत सुरू आहे.
या कंपन्यासुद्धा भाजप आमदारांच्या निकटवर्तीयांच्या आहेत. तलाठी पदभरतीत अर्ज केलेल्या उमेदवारांना अखेरच्या क्षणी कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केले नसल्याने परिक्षेस अपात्र करण्यात आल्याने या कंपन्यांकडून पर्यायाने शासनाकडून बेरोजगारांना लूटण्याचे काम होत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.