एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यातील तापमानात चढउतार होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाच राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढणार आहे. पश्चिम विदर्भापासून, मराठवाडा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाची स्थिती कायम असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
मराठवाडा, विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. शहरातील काही भागात पुढील तीन ते चार दिवस ढगाळ आणि दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच सोमवारपर्यंत जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
राज्यातील बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, यवतमाळ, नागपूर, परभणी, अमरावती, भंडारा, गोंदिया या भागांत अवकाळी पाऊसासह जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे. तर पुणे, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, वाशीम, लातूर, बुलडाणा, सातारा, सांगली, नाशिक, नगर, वर्धा, धाराशिव, अकोला या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज सकाळपासून पुण्यातील वातावरण ढगाळ झाले आहे. तर काही ठिकाणी हलका पाऊसही झाला.