द्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांच्या मंगळवार १७ सप्टेंबर रोजी आयोजित डहाणू येथील पत्रकार परिषदेत त्यांनी वाढवण बंदर, मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
पत्रकारांचा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राज ठाकरे सहभागी होणार का या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार नसून “आम्ही असताना राज ठाकरेंची काय गरज” असे वक्तव्य केले आहे.
केंद्र शासनाकडून सामाजिक सक्षमीकरण शिबीर अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात शासनाच्या एडीप योजनेअंतर्गत अपंगांना निःशुल्क सहायक उपकरण वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत डहाणू येथील सेंट मेरी विद्यालयात तालुक्यातील लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले डहाणू येथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी डहाणू तालुक्यातील प्रस्तावित वाढवण बंदरविषयी बोलताना बंदरामुळे देशाचा विकास होणार असून बंदरामुळे विस्थापित होणाऱ्यांचे योग्य नियोजन शासनाकडून करण्यात येईल शिवाय यामुळे साधारण ४ लाख लोकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाविषयी बोलताना त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी आम्ही सुरुवातीपासून मराठ्यांसोबत असून त्यांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली.