राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला; शरद पवारांकडे दिलगिरी व्यक्त केली

Photo of author

By Sandhya

राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला

राज्यात 2 जुलै रोजी झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर अजित पवार यांच्यासह गटातील सर्व नेत्यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेट घेतली. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

आज अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, आत्राम मेश्राम आणि अदिती तटकरे हे सर्व वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.

नुकतीच राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही बैठक संपली आहे. त्यामुळे आता या भेटीत नेमकं काय घडलं कोणत्या विषयावर चर्चा झाली हे आता समोर आलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही या भेटीची माहिती दिली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. जयंत पाटील म्हणाले की, “शरद पवार यांना पूर्व कल्पना न देता, त्यांची कोणतीही अपॉइंटमेंट न घेता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांनची भेट घेतली.

तब्बल तासभर ही भेट झाली. त्यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

हे सर्व नेते अचानक भेटायला आले होते. नंतर मला बोलावलं.. या आमदारांनी शरद पवार यांना भेटणं ही अनपेक्षित घटना आहे. त्याचा आम्ही कधीच विचार केला नव्हता. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. शरद पवार यांच्यासोबत आम्ही बसू तेव्हा चर्चा करू’, असं जयंत पाटील म्हणाले.

Leave a Comment