राष्ट्रवादीने केला खोके दिवस साजरा ; केली पन्नास खोक्यांची होळी

Photo of author

By Sandhya

राष्ट्रवादीने केला खोके दिवस साजरा ; केली पन्नास खोक्यांची होळी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली “गद्दार दिन” साजरा करण्यात आला. ठाणे शहरात पन्नास खोक्यांची होळी करण्यात आली.

यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनानंतर आनंद परांजपे यांना पोलिसांनी अटक केली.

मागील वर्षी २० जून रोजी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांनी सुरतमार्गे गुवाहाटी गाठून महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. त्याचा निषेध करण्यासाठी डॉ जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले.

“खाऊन खाऊन माजलेत बोके, पन्नास खोके- पन्नास खोके; महाराष्ट्र त्रस्त, खोकेवाले मस्त” अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. तसेच, पन्नास खोके असे कागद चिकटवलेले खोके यावेळी जाळण्यात आले.

या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी मुंबई-सुरत-गुवाहाटी असा संदेश लिहिलेले टी-शर्ट परिधान केले होते. या आंदोलनानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आनंद परांजपे यांना अटक करून सोडून दिले.

दरम्यान, या प्रसंगी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी गद्दारांची तुलना सूर्याजी पिसाळ यांच्याशी केली. ते म्हणाले, वर्षभरापूर्वी सुर्याजी पिसाळांच्या औलादींनी महाराष्ट्राशी गद्दारी करून सुरतेकडे प्रयाण केले होते. त्याचा निषेध म्हणून आजचे आंदोलन करण्यात आले.

पन्नास खोक्यात स्वतःला विकणाऱ्यांचे चारित्र्य काय असेल हे सांगायलाच नको. पण, हे पन्नास खोके किती पुरणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना मतपेटीतून धडा शिकवणारच आहे.

आता जे काही सर्व्हे येत आहेत, ते सर्व मॅनेज आहेत. शिंदे सरकार आणि भाजपचा गाशा १०० जागांच्या आतच गुंडाळावा लागणार आहे. कारण, गेल्या वर्षभरात महिलांना मारहाण करण्याची संस्कृती महाराष्ट्रात वाढीस लागली आहे.

रोशनी शिंदे आणि आयोध्या पौळ ही ती उदाहरणे आहेत. अयोध्या पौळला मारणाऱ्या महिला या जयभीम नगरमधील नव्हत्या. गेले वर्षभर दादागिरी करणे, खोट्या केसेस टाकणे असेच प्रकार या लोकांनी केले आहेत. त्यावरून पन्नास खोक्यावाले मनातून किती क्रूर आहेत, हे स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page