![आ. रवींद्र धंगेकर](https://dainikesandhya.com/wp-content/uploads/2024/01/Untitled-design-2024-01-31T110437.225.png)
ललित पाटील प्रकरणातील अनेक गोष्टी उघडकीस आणल्यामुळे पुणे पोलिस व भाजपचे नेते मला अडचणीत आणण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
पुणे पोलिस भाजपच्या ताटाखालचे मांजर आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांच्या आदेशानुसार माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. या पार्श्वभूमीवर धंगेकर म्हणाले, टाकीच्या उद्घाटनासंदर्भात मुख्य सभेचा ठराव मंजूर झाला आहे.
या ठरावाप्रमाणे उद्घाटनाचा कार्यक्रम होणे गरजेचे असताना पाणीपुरवठा विभागाने नियम धाब्यावर बसवत स्थानिक आमदाराच्या दबावाखाली त्यांच्या हस्ते उद्घाटन केले.
टाकीसाठी पाठपुरावा करणारे व निधी उपलब्ध करून देणारे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांना कार्यक्रमाला बोलवावे, एवढीच आमची मागणी होती. मात्र, ती मान्य केली नाही. मुख्य सभेच्या ठरावानुसार कार्यक्रम घेतला नाही; म्हणून माझ्याकडून संबंधित अभियंत्याला शिवीगाळ झाली. ती मी नाकारत नाही. शिवीगाळ प्रकरणामध्ये समज दिली जाते.
मात्र, माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा भाजपच्या नेत्यांच्या दबावाखाली दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या हिरवळीवर आंदोलन व सभा घेऊ नयेत, असे पत्र जिल्हाधिकार्यांनी महापालिकेला दिले आहे.
असे असताना महापालिकेच्या अभियंता संघाने माझ्याविरोधात हिरवळीवर निषेध सभा घेतली. ही सभा बेकायदेशीर असून, सभा घेणार्यांवर कारवाई करावी, असी मागणी मी महापालिका आयुक्तांकडे करणार असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.