राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले आहे . त्यातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी एक मोठे विधान केले आहे.
आम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला तयार आहोत, पण आधी विरोधकांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ही बाब मान्य असल्याचे वचन द्यावे, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी “मनोज जरांगे पाटील यांना अपेक्षित असलेले आरक्षण द्यायला आम्ही तयार” असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला जितके आरक्षण देणे शक्य आहे, तितके आरक्षण आम्ही दिले आहे.
परंतु, तेवढ्याने मनोज जरांगे पाटील यांचे समाधान झालेले नाही. त्यापेक्षा जास्त आरक्षण हवे असेल तर तो मागण्याचा अधिकार मनोज जरांगे यांना आहे.
पण आता (लोकसभा निवडणूक) ज्यांना कोणाला जास्त मतं पडली आणि जे निवडून आले त्यांनी म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फक्त एकच मागणी करावी की, जरांगे पाटील ज्याप्रमाणे म्हणतात ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्या, ते आरक्षण द्यायला आम्ही तयार आहोत. तसं वचन विरोधकांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात द्यावे, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवारी उभे करण्याची भाषा केली आहे. याबद्दल रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की, आम्हाला काहीही वाटत नाही.
मनोज जरांगेंनी खुशाल उमेदवार उभे करावेत. त्यांना अधिकार आहे, असं कोण म्हणू शकतो, उमेदवार उभे करु नका. त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमुळे सोलापूर शहरातील शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार सोलापूर शहरातील महाविद्यालय, विविध शाळा आणि शैक्षणिक शैक्षणिक संस्थांना सु्ट्टी देण्यात आली आहे.