मुंबईकरांना दिलासा; ३१ मेनंतर अपूर्ण रस्त्यासाठी कंत्राटदारावर कारवाईचा इशारा

Photo of author

By Sandhya


मुंबई : मुंबईत सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्याची कामे व्यापक स्वरूपात सुरू असून, त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांचीही प्रचंड गैरसोय होत असल्याने महापालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या टीकेची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतल्याचे दिसत आहे. ३१ मे, २०२५नंतर एखाद्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम अपूर्णावस्थेत आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांचा पावसाळ्यातील प्रवास सुकर होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होत आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी संपली नाहीत तर होणाऱ्या प्रवासहालाचा विचार करूनही मुंबईकरांना धडकी भरत आहे. मात्र, ही कामे वेळेत पूर्ण झाली तर पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांपासून मुंबईकरांची सुटका होईल आणि पावसाळ्यातील प्रवास सुकर होईल. मुंबईकरांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारी आणि टीकेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी रस्ते कामांचा कंत्राटनिहाय आढावा घेत संबंधितांशी संवाद साधला. यावेळी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, रस्ते आणि वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कंत्राटदारांचे प्रतिनिधी, विविध सेवा संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

खड्डेमुक्त प्रवासासाठी महापालिकेने रस्ते काँक्रीटीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. आत्तापर्यंत १ हजार ३३३ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम दोन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ६९८ रस्ते (३२४ किमी) आणि दुसऱ्या टप्प्यात एकूण १ हजार ४२० रस्त्यांचे (३७७ किमी) काँक्रीटीकरण प्रस्तावित आहे. ही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. रस्ते कामासाठी नऊ कंत्राटदार नेमण्यात आले असून, त्यांच्या कामाच्या प्रगतीत फरक आहे. काही कंत्राटदार अपेक्षित गतीने, तर काही कंत्राटदार धीम्या गतीने कामे करत आहेत. त्याअनुषंगाने कंत्राटदारनिहाय आढावा बैठकीत घेण्यात आला. ३१ मे, २०२५नंतर एकही रस्ता अपूर्णावस्थेत आढळता कामा नये. जर एखादा रस्ता अपूर्णावस्थेत आढळला तर त्या कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त गगराणी यांनी या बैठकीत दिला.

‘अजूनही दोन महिन्यांचा कालावधी हातात असून, सर्व कामे पूर्ण करणे शक्य आहे. कामे सुरू असताना कंत्राटदारांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्तारोधक, प्रदूषण टाळण्यासाठी हिरवे कापडी आच्छादन याचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. कामे सुरू असताना काही कमतरता राहिल्यास कंत्राटदारांनी सजग राहून तत्काळ दुरुस्ती करावी. कंत्राटदार जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी करत असेल तर कठोर स्वरूपाची कारवाई केली जाईल’, असेही गगराणी यांनी स्पष्ट केले.

विविध सेवा / उपयोगिता (युटिलिटी) वाहिन्यांच्या संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. रस्त्यांची कामे सुरू असताना उपयोगिता वाहिन्यांचे त्वरित स्थलांतरण करावे. काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण झाल्यावर रस्ता खोदण्यास कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर ‘डक्ट’ बांधत आहे. या ‘डक्ट’चा वापर करण्यासंदर्भात उपयोगिता वाहिन्यांच्या संस्थांसमवेत समन्वय ठेवावा, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

Leave a Comment