रोहित पवार : अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार शरद पवार यांच्या संपर्कात…

Photo of author

By Sandhya

रोहित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी 18 ते 19 आमदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

यापैकी कोणाला घ्यायचे आणि कोणाला घ्यायचे नाही हे ठरविले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अजित पवार गटाचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात असून, भविष्यात ते काय भूमिका घेणार याबाबत आपणास उत्सुकता असल्याचेही आमदार पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महायुतीत गेलेेले 18 ते 19 आमदार पुन्हा आमच्या पक्षात यायला इच्छुक आहेत, अशी माहिती आपणास वरिष्ठांकडून मिळाली आहे.

हे आमदार आमच्या पक्षाच्या प्रमुखांच्या संपर्कात आहेत, असेही आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे अजित पवार गटाचे आणखी सुमारे 12 आमदार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि भविष्यकाळात ते काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार असल्याचेही आमदार रोहित पवार म्हणाले.

Leave a Comment