महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांना सोळा सोमवार ,चौदा गुरुवार करण्यात वेळ घालवत बसण्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान वाचण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी,”तुमच्यावर अन्याय, अत्याचार झाला तर काय करायचं या बाबत सोळा सोमवार अथवा पोथी पुराणात उल्लेख नाही.
मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात तो असल्याने महिलांनी शिक्षण घेतले पाहिजे, अशा प्रकारचे स्पष्ट मत रुपाली चाकणकर यांनी मांडले आहे. त्या मुक्ताईनगर येथे झालेल्या महिला संवादाच्या वेळी बोलत आहेत.
या संवाद मेळाव्यात आपल्याला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, मात्र प्रतिकूल परिस्थिती मध्ये सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू करून महिलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला होता.
असे असताना महिला सोळा सोमवार, चौदा गुरुवार आणि पंधरा रविवार करण्यासाठी वेळ घालवतात, यासाठी सावित्री बाईंनी शिक्षण दिले नाही तर, शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ राहता आले पाहिजे, प्रश्न विचारता आले पाहिजे, जाब विचारता आला पाहिजे, या सगळ्याचा अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला दिला आहे, असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय.
लग्नपूर्व समुपदेशन काळाची गरज – दरम्यान , यावेळी चाकणकर यांनी लग्नाच्या पूर्वी समुपदेशन करणे कसे गरजेचे आहे याविषयी माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी,”लग्न झाल्यानंतर छोट्या-छोट्या गोष्टीतून भांडणं होऊन त्याचं रूपांतर घटस्फोटात होतं. घटस्फोट होणे दोघांसाठीही क्लेशदायक असतो. हे टाळण्यासाठी लग्नपूर्व समुपदेशन होणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यामुळे असे समुपदेशन कक्ष जिल्हा स्तरावर होण्यासाठी आपले शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली. बालविवाह, विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्नाची गरज – तसेच बालविवाह सारख्या प्रथा दुर्दैवांनी अजूनही सुरु आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मोठे प्रयत्न करूनही असे विवाह होतात. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे.
पण बालविवाह का करू नये याची माहिती अधिक व्यापक प्रमाणात सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तसेच महिला विधवा झाली की तिच्यावर अनेक सामाजिक बंधणे लादली जातात. ती बंद व्हावी, तिच्यात आत्मविश्वास निर्माण करून तिच्या मुलांना वाढविण्यासाठी तिला स्वतःच्या पायावर उभं करण्याचे प्रयत्न करायला हवेत.
यासाठी समाज शिक्षणाची मोठी गरज आहे. प्रत्येक गावामध्ये या दोन्ही गोष्टीसाठी ग्रामसभेत ठराव होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा चाकणकरांनी व्यक्त केली.