कोविड-19 साथीच्या काळात लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्यात बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे असा निष्कर्ष राज्य महिला आयोगाकडून काढण्यात आला आहे.
महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, एकट्या लातूरमध्ये 37 बालविवाह थांबवण्यात आले असून यातील दोन घटनांसंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मात्र वाढलेल्या बालविवाह प्रकरणांची निश्चीत आकडेवारी मात्र त्यांनी सांगितली नाही.
ग्रामसभांनी बालविवाहांना काटेकोरपणे आळा घालण्यासाठी ठराव केले पाहिजेत आणि लग्नाचे आमंत्रण छापणाऱ्या युनिट्ससह सर्व संबंधितांवर त्या संबंधात कारवाई केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
चाकणकर यांनी दावा केला की मोबाईल फोन आणि इतर प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे पालक आणि मुलांमध्ये अंतर निर्माण झाले आहे, त्यामुळे मुली प्रेमात पडण्याचे आणि पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
पोलिसांच्या ‘दामिनी पथकाने’ मुलींच्या संरक्षणासाठी त्यांच्याशी अधिक संवाद साधला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
“महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत आयोगाने 28 जिल्ह्यांतील सुमारे 18,000 तक्रारींचे निराकरण केले आहे. अशी माहितीही त्यांनी दिली.
यावेळी आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर उपस्थित होते.