मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २० जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेतं याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी मनोज जरांगे यांनी शांतता फेरी काढली. या शांतता फेरीची सांगता छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवरून आता आमदार सदाभाऊ खोत यांनी भाष्य करत मनोज जरांगे पाटील यांना एक खोचक सल्ला दिला आहे. “मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पिच्छा सोडून आता शरद पवारांच्या घराकडे मोर्चा वळवावा”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
सदाभाऊ खोत काय म्हणाले? – “रयत क्रांती संघटनेला यावेळीही भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेची एक जागा देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा सन्मान केला. भारतीय जनता पक्षाने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझाही सन्मान करून मला संधी दिली.
शेवटी आम्ही एका कुटुंबातील आहोत. आम्ही कधीही विचार सोडलेला नव्हता. आम्ही तत्व सोडलेले नव्हते. कोणत्याच पक्षाने घटक पक्षाला येवढा मोठा सन्मान दिलेला नाही.
भारतीय जनता पक्षाने महादेव जानकर, विनायक मेटे यांना विधानपरिषद दिली होती. तसेच मलाही दुसऱ्यांदा विधानपरिषद दिली. त्यामुळे विस्तापित वर्गाला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
“मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, असं आता ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने जाहीर करावं. ते जर तसं जाहीर करणार नसतील तर मी मनोज जरांगे यांना विनंती करतो की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आणि भाजपाचा पिच्छा त्यांनी सोडावा आणि बारामतीच्या दिशेने तुमचा मोर्चा वळवावा”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.